१० ऑक्टोबरच्या हुतात्मा दिनापासून ठाणे-पालघर जिल्ह्यांच्या सात तालुक्यांत माकपच्या नेतृत्वाखाली होणार ५० हजार लोकांचे जबरदस्त ठिय्या आंदोलन!
१० ऑक्टोबर ह्या ठाणे-पालघर जिल्ह्यात दरवर्षी पाळण्यात येणाऱ्या हुतात्मा दिनी आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या स्मृतिदिनी जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सात तालुक्यांत ५०,००० हून अधिक लोकांचे जबरदस्त ठिय्या आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. त्यात किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय या जनसंघटनाही ताकदीने उतरणार आहेत.
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे बुलेट ट्रेन, एक्सप्रेस हायवे आणि नदीजोड सारखे प्रकल्प ताबडतोब रद्द करा; वनजमिनी, वरकस जमिनी, देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा; जिल्ह्यातील धरणांचे पाणी येथील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी प्राधान्याने द्या; दुष्काळ, रेशन, रोजगार, शिक्षण, पेन्शन, वीज, आरोग्य, घरकुले, रस्ते, गावठाण विस्तार असे स्थानिक प्रश्न ताबडतोब सोडवा; या मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन होणार आहे. स्थानिक मागण्या प्रशासनाने मान्य करेपर्यंत हे आंदोलन कोठेही मागे घेतले जाणार नाही.
तसेच या आंदोलनात भाजपच्या सरकारच्या धोरणांतून प्रचंड प्रमाणात वाढलेले पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंचे जीवघेणे भाव; भयानक प्रमाणात वाढलेली बेरोजगारी, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा व कुपोषण; राफेल लढाऊ विमानांच्या सौद्यात मोदी सरकारने केलेला उदंड भ्रष्टाचार व त्याची वशिलेबाज भांडवलशाही; देशात पेटविण्यात येत असलेले धर्मान्ध व जातपातवादी वातावरण या मुद्द्यांवरही लोकांमध्ये प्रखर जनजागृती केली जाणार आहे.
या आंदोलनाचे ठिकठिकाणचे नेतृत्व पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते एल. बी. धनगर व माजी खासदार/आमदार लहानू कोम, पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य बारक्या मांगात व किसन गुजर, पक्षाचे राज्य कमिटी सदस्य रतन बुधर, रडका कलांगडा, सुनील धानवा, किरण गहला, लहानी दौडा, विनोद निकोले व लक्ष्मण डोंबरे, पक्षाचे जिल्हा सचिवमंडळ सदस्य एडवर्ड वरठा, यशवंत घाटाळ, भारत वळंबा, सुदाम धिंडा व प्राची हातिवलेकर, तलासरी पंचायत समितीच्या सभापती सविता डावरे व उपसभापती वनशा दुमाडा, तलासरीच्या नगराध्यक्षा स्मिता वळवी व उपनगराध्यक्ष सुरेश भोये, पक्षाच्या जिल्हा व तालुका कमिट्याचे सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य आणि अनेक गावचे सरपंच व उपसरपंच हे करणार आहेत.
हे अभिनव ठिय्या आंदोलन उद्या १० ऑक्टोबर रोजी डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड, पालघर, वाडा आणि शहापूर या सर्व ठिकाणी प्रत्येकी हजारोंच्या सहभागाने दुपारी सुमारे १२ वाजता त्या-त्या प्रांत/तहसील कार्यालयांवर जबरदस्त मोर्चे काढून सुरू होईल आणि स्थानिक मागण्या मान्य होईपर्यंत ते सुरू राहील.
आपल्या लोकप्रिय दैनिकाचे/वृत्तवाहिनीने/वृत्तसेवेचे पत्रकार आणि छायाचित्रकार हे आंदोलन कव्हर करण्यासाठी अवश्य पाठवावेत आणि या आंदोलनास अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी ही आवर्जून विनंती आपणांस करत आहोत. धन्यवाद!
आपले,
डॉ. अशोक ढवळे
बारक्या मांगात